बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने औरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर मरण पावले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.