इंदापूर गावचे सुंदर "पळसनाथ मंदिर"
जुन्या काळात पळसदेव गाव रत्नपूर नावाने ओळखले जात होते आणि बाजारपेठेचे मुख्य केंद्र होते. या परिसरात एकूण पाच मंदिरे आहेत. त्यापैकी पळसनाथ मंदिर आकाराने व उंचीने मोठे आहे, त्यामुळेच मंदिर पाण्याखाली गेलेले असले तरी मंदिराचा कळस पाण्याच्या वर असतो.
भीमा नदीच्या संगमाच्या ठिकाणी शंकर आणि विष्णू या दोन्ही देवतांचे मंदिर बांधून त्यांची प्रतिष्ठापना करावी ह्या उद्देशाने शके १०१९ (सन १0९७) मध्ये दंडनायक चंगदेव याने या विष्णूगृहाची उभारणी केली. बसवण उपाध्यायाने ईश्वर संवत्सरात ह्या प्रासादाची निर्मिती केली असावी. तसेच आपल्या भाई नाव असलेल्या पुत्राच्या ठेवीतील सोन्याची १००० नाणी, प्रासादासाठी करमुक्त जमीन (अकरवातोत्तर) आणि १०० सुवर्णमुद्रा दयाप्रसाद (दाउपसाउ) अर्पण केल्या. हे विष्णूगृह शके १०१९ साली पूर्ण (मंगलमहर्षी) झाले. पळसदेव शिवमंदिराच्या शेजारी असलेल्या विष्णूमंदिराच्या सभामंडपातील स्तंभावर दोन ओळीचा शिलालेख कोरलेला असून त्यात मंदिरासंदर्भातील वरील माहिती मिळते.
श्री चांगदेव दंडनाकें विष्णुगृह केलें|ईश्वर संवछरी नीफजले|प्रासादी बसवण ऊवजा तेहाचे पुत्र भाइया|बंभी
निष्पती सोनेया साहस्त्रु एकु १००० प्रासादिअ अकरवातोत्तरे भूमी १०० दाउपसाउ वाहिला|सकु १०१९ मंगल महश्री|
विष्णूमंदिर आणि शिवमंदिर पश्चिमाभिमुख असून या दोन्ही मंदिरांची वास्तूरचना साधारणपणे सारखीच आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, तीनही बाजूंना असलेली प्रवेशद्वारे, तीनही बाजूंना असलेले मुखमंडप अशी रचना दोन्ही मंदिरांची आहे. विष्णू मंदिराचा शिखर पूर्णपणे नष्ट झाले आहे. शिवमंदिरावर गर्भगृहावर मुख्य शिखर असून इतर तीन मुखमंडपावर प्रत्येकी एक शिखर असावे. मंदिराचे शिखर भूमिज पध्दतीचे असून ते सप्तभूमिज आहे. शिखरावर गवाक्षे असून त्याच्या लतापट्टावर वर्तुळाकार सर्पवेटोळे दिसतात. मंदिरांतील खांबावरून हि दोन्ही मंदिरे यादवपूर्व काळातील असे वाटते.
शिवमंदिर २८ फुट उंच असून दगडी बांधकाम ८ फुटांचे आणि त्याच्यावरती विटांचे बांधकाम आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पाचशाखीय असून त्याच्यावर व्याल, पद्मपत्र, स्तंभशाखा, वेलीशाखा, वाद्यांसहित गंधर्व आणि सूरसुंदरी आहेत. शिवमंदिराचे मूळ शिखर कोसळल्यानंतर उत्तरकाळात मूळ शिखराप्रमाणेच नवीन शिखर बांधले असावे. शिखर उत्तरकाळात पुन्हा बांधले ह्याला पुरावा बांधकामात वापरलेला चुना आणि भाजक्या पक्क्या विटा. शिखरावर असलेल्या गवाक्षांच्या कमानीत विटांचे पुढे आलेले कंगोरे घासुन तयार केले आहेत. शिखरावरील कळशाचा आकार अमलाकर असून सर्वात वर स्तुपिका आहे. स्तंभांवरील नाजूक शिल्पकाम सुंदर आहे. स्तंभांवरील साखळदंडांची नक्षी, छोट्याछोट्या घंटांची नक्षी बघून त्याकाळातील शिल्पकारांचे दगडावर कोरीवकाम करण्याचे कसब दिसून येते. शिवमंदिरातील शिवलिंगाची स्थापना पुनर्वसित झालेल्या पळसदेव गावात नवीन भूमिज पध्दतीचा प्रासाद बांधून त्याच्यात करण्यात आलेली आहे.